Uncategorized

गोदावरी चित्रपट परीक्षण

Spoiler Alert जर आपण चित्रपट पहिला नसेल तर प्रथम पहावा आणि मग पुढे वाचावे

No man ever steps in the same river twice, for it’s not the same river and he’s not the same man.

Heraclitus

नदी आणि आयुष्य प्रवाही असत. जसा आयुष्यात तोच क्षण पुन्हा येत नाही तसं नदीमधील पाणीही पुढे पुढे जात असत ते कधी साचून रहात नाही.

डबकी आपण करतो, साचून आपण राहतो. कधी भूतकाळातल्या गोष्टी तुंबऊन दुःखी कष्टी होऊन बसतो आणि कधी आपल्याच प्रवाहाला विचारांच्या डबक्यांमधे कोंडू पाहतो.

पण मग आयुष्य कधीतरी एकदम पुरासारख एकदम आत घुसत आणि सगळी डबकी उध्वस्त करून जातं, सगळी तुंबलेली घाण वाहून नेत आणि सगळं प्रवाही करून टाकतं.

गोदावरी पाहिल्यावर असं काही झालं आज …

मी स्वतःला खुप रीलेट करू शकतो निशिकांतच्या फ्रस्ट्रेशनशी. तो चाळिशीत शिरलेला आणि मी चाळिशीतून बाहेर पडणारा, साधारणपणे निम्मं आयुष्य पार झाल्यावर जेव्हा अस जाणवत अरे काहीच नाही घडलं आपल्या आयुष्यात, काहीच नाही घडऊ शकलो आपण आत्तापर्यंत. फक्त दोष देत राहिलो कधी नशिबाला, कधी आई बाबांना तर कधी आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसालाच …. त्यांचा दोष असेलही किंवा नसेलही पण आयुष्य तर गेलं ना ….. निशी भानावर येतो कारण त्याला कळतं की त्याच्याकडे फक्त दोनच महिने आहेत जगायचे कारण त्याला ब्रेन ट्युमर झालाय आणि तो त्याच्या आयुष्याकडे नव्याने बघायला लागतो तेव्हा त्याला सगळं स्पष्ट दिसू लागतं, आणि तो परत त्याच्या जीवनाशी रिकनेक्ट होतो.

धर्म, परंपरा, कर्म कांड, याकडे हल्ली आपण थोडे साशंकतेने बघतो. आपल्या अवती भवती यासंबंधी चालणाऱ्या डाव्या आणि उजव्या चर्चांचा आपल्यावर खोल परिणाम होत असतो. परंपरा नदीसारखी असते ती आपल्यामधून वाहत असते पण आपण काही नीट समजून न घेता त्या परंपरेला आपल्या अर्धवट ज्ञानाचे बांध घालू लागतो मग धार्मिक विधी कर्मकांड वाटू लागतात आणि पिंडदान आणि वर्षश्राध थोतांड.

आपल्या धारणा या आपल्या जीवन प्रवाहाच्या अखंड घटक असतात मी तर अस म्हणीन की श्रद्धा एकवेळ आंधळेपणाने करावी पण अश्रद्ध व्हायला खुप डोळसपणे सार बघावं लागतं आणि जेव्हा आपण जाणिवेच्या नजरेनं सार शोधायला बाहेर पडतो तेव्हा सारी संगती लागत जाते. निशी च असच होत जे काही त्याला विसविशित आणि असंगत वाटत असतं त्या साऱ्याची संगती त्याला जुळून येते. सिनेमाच्या सुरवातीला वैतागलेला, निराश आणि सतत भांडणारा निशी सिनेमाच्या शेवटच्या सीन मध्ये एकदम प्रसन्न आणि मोकळा झालेला दिसतो, त्याच्या परंपरांच्या प्रवाहातील बांध फुटलेले असतात आणि त्याच आयुष्य गोदावरी सारखं प्रवाही झालेलं असत.

कथानक थोड अपूर्ण वाटतं पण मला अस वाटत की थिएटर मध्ये दाखवण्यासाठी काही काट छाट केली असावी फेस्टीव्हल ची पूर्ण प्रिंट बघितली तर उलगडा होईल.काही त्रुटी जाणवतात पण त्या पट कथेमधील आहेत की दिग्दर्शना मधील ते कळतं नाही जसं की निशी आणि त्याच्या आई मधील बायकोमधील आणि मुली मधल्या नात्याची वीण नीट मांडलेली नाही किंवा मला तरी ती नीट समजली नाही. निशिकांत चे वडील त्याच्या वडिलांवर रुष्ट असतात पण ते का हे नीटसं समजत नाही. प्रियदर्शन च कासव अभिनय म्हणून खुप छान आहे पण कथे मध्ये ते अपूर्ण वाटतं. आपल्या मुलाचा देह गोदावरी मध्ये शोधणारा बँकेमधील माणूस आबांचे अंत्यसंस्कार होताना निशिला मिठी मारून रडतो पण कथेचा एक दोर इथेपण थोडा कचा वाटतो. कासव जिवंतपणीच निशीच पिंडदान करतो पण हा धागा पण थोडा अपूर्ण वाटतो.

अस वाटत सिनेमाचा वेळ कमी पडला की काय काहीतरी अर्धवट रहात. असो अस असल तरी गोदावरी आपल्याला आतून आणि बाहेरून हलऊन जातो हे मात्र नक्की

तंत्र म्हणून चित्रपट अप्रतिम आहे, नाशिकच एक वेगळं चित्रण दिग्दर्शकाच्या नजरेतून आपल्याला बघायला मिळतं. सर्वच कलाकारांनी कमाल काम केलं आहे. जितू तर निशी जगला आहे, तो माणूस आणि कलाकार म्हणून मनस्वी आहेच त्याच्या कला कारकिर्दीमध्ये ही भूमिका अगदी ठळकपणे नोंदवली जाईल हे मात्र नक्की. जितेंद्र जोशी या चित्रपटाचा निर्माता सुद्धा आहे हे विशेष करून सांगावे लागेल. तसा हा लौकिकार्थाने व्यावसायिक चित्रपट नाही त्यामुळे अश्या चित्रपटासाठी पैसा लावायला धाडस लागतं ते त्यानं दाखवलं त्यामुळे त्याच विशेष कौतुक. चित्रपटाच्या आरंभापासून शेवटापर्यंत असणारं बॅकग्राऊंड म्युझिक अप्रतिम आहे. Cinematography पण अप्रतिम आहे, साऊंड डिझाईन पण खुप छान आहे. हल्ली मराठी सिनेमा या सर्व तांत्रिक गोष्टीमध्ये खूपच उजवा ठरत आहे.

निखिल महाजन चे आधीचे सिनेमे मी बघितले नाहीत पण या सिनेमामध्ये दिग्दर्शक दिसतच नाही आणि म्हणजे तो सगळीकडे आहे जसं की आपल्याला देव दिसत नाही पण तो सगळीकडे आहे 😀 सिनेमा रटाळ होत नाही त्याची गती जाणवत राहते आणि दिग्दर्शकाची प्रत्येक फ्रेमवरील पकड सुध्दा.

प्लीज थिएटर मध्ये जाऊन बघा यामुळे अश्या निर्मात्यांना असे विषय हाताळणारे सिनेमे करायला अजून प्रोत्साहन मिळेल

Leave a comment